नगरगाव बालभवन केंद्राच्या मुलांनी जिंकली मने.
बालभवन केंद्राने मुलांच्या जीवनामध्ये गोडवा निर्माण केला..
प्रशासकीय अधिकारी संजय मांजरेकर .
नगरगाव बालभवन केंद्राच्या गुणदर्शन कार्यक्रमाने उपस्थतांची मने जिंकली.
प्रत्येक मुलांमध्ये कलेचा अंकुर असतो. मात्र त्याला सातत्याने खतपाणी घालणे अत्यंत गरजेचे असते. यामुळे मुलांना कला क्षेत्रामध्ये विकसित करायचे असेल तर त्यांच्या पाठीवर सातत्याने कौतुकाची थाप देणे गरजेचे आहे .खास करून पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न सातत्याने केला पाहिजे .गोवा बालभवन केंद्राच्या माध्यमातून ठीकठिकाणी सुरू असलेल्या केंद्राच्या सहयोगाने हजारो मुलांच्या कला जीवनामध्ये गोडवा निर्माण झालेला आहे. प्रत्येकामध्ये असलेली कला विकसित करून त्यांना नावलौकिक प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून बालभवन केंद्राने आतापर्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. यामुळे गोव्याच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये बालभवन केंद्र हे मुलांच्या कला क्षेत्रात सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे योगदान देत असल्याचे प्रतिपादन बाल भवन केंद्राचे प्रशासकीय अधिकारी संजय मांजरेकर यांनी केले आहे.
नगरगाव बालभवन केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या गुणदर्शन कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून ते बोलत होते. एक महिना सुरू असलेल्या हिवाळी शिबिराच्या सांगता समारंभात गुणदर्शन कार्यक्रमांमध्ये मुलाने उत्कृष्ट असे कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार व सत्तरी पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत पुरोहित दिलीप छत्रे, बालभवन केंद्राच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष शंकर पर्येकर, उपाध्यक्ष वरदा गाडगीळ, बालभवन केंद्राचे प्रमुख प्रेमानंद कुंभार व इतरांची खास उपस्थिती होती.
यावेळी बोलताना संजय मांजरेकर यांनी सांगितले की नगरगाव बालभवन केंद्र मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असते. अनेक प्रकारचे उपक्रम मुलांच्या विकासासाठी आयोजित करण्यात येत असतात .यासाठी पालकांचे चांगल्या प्रकारचे सहकार्य लाभत असल्यामुळे त्यांनी पालकांचे कौतुक केले. कोणत्याही कार्यासाठी पालकांचे सहकार्य महत्त्वाचे असते. पालक व शिक्षक यांच्या माध्यमातून मुलांचा चांगल्या प्रकारे विकास घडवून येऊ शकतो .नगरगाव बालभवन केंद्रामध्ये अशा प्रकारची प्रक्रिया पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले.
ज्येष्ठ पत्रकार उदय सावंत यांनी यावेळी बोलताना मुलांमध्ये असलेला कलेचा अंकुराचे परिवर्तन फळांमध्ये व्हायचे असेल तर समाजाच्या प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ती काळाची गरज आहे .कला ही माणसाला आनंद निर्माण करणारी महत्त्वाची प्रक्रिया आहे .यामुळे अंगामध्ये असलेल्या कलेला सातत्याने खतपाणी घालण्याचा प्रयत्न झाल्यास कलाकाराच्या जीवनामध्ये स्फूर्ती निर्माण होऊ शकते. बालभवन केंद्र हा यासाठी महत्त्वाचा गाभा आहे असे यावेळी त्यांनी सांगितले. अशा शिबिराच्या माध्यमातून नवोदित बालकलाकारांना सहभागी होऊन त्यांच्यामध्ये प्रोत्साहित भावना निर्माण करण्याची संधी उपलब्ध होत असते असे यावेळी त्यांनी सांगितले. नगरगाव केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभल्याबद्दल त्यांनी पालकांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.
दिलीप क्षेत्र यांनी यावेळी बोलताना या केंद्राने नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची संधी मुलांना उपलब्ध करून दिलेली आहे याबद्दल त्यांनी शिक्षकांचे अभिनंदन केले.
सुरुवातीला पारंपारिक समय प्रज्वलित करून या गुणदर्शन कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक बालभवन केंद्राचे प्रमुख प्रेमानंद कुंभार यांनी केले. त्यांनी यावेळी बोलताना या बालभवन केंद्रासाठी पंचायत व पालकांचे चांगल्या प्रकारचे सहकार्य लाभत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. कोणतीही संस्था पालकांच्या व नागरिकांच्या सहकार्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही असे स्पष्ट करताना पालक शिक्षक संघ सुद्धा चांगल्या प्रकारे कार्यरत आहे तसे खास नमूद केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालभवन केंद्राच्या विद्यार्थिनी मानसी भावे यांनी केले.
त्यानंतर मुलांतर्फे उत्कृष्ट असे पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. नृत्य-गणेश,समुहगीत-बिस्कुटचा बंगला, नृत्य-मुकुंदा मुकुंदा,समुहगीत-देशभक्ती गीत
नृत्य-दैवत छत्रपति, समुहगीत-कोंकणी, नृत्य-कोळी नृत्य, समुहगीत-चिवुताई,गायन, वाद्यवृंद जुगलबंदी, दिंडी मुंगी उडाली आकाशी, राष्ट्रगीत.
यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक व पालकांची उपस्थिती होती.
शेवटी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली